नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून चर्चा सुरू झाली आहे. यादरम्यान विरोधकांनी कडाडून मोदी सरकरावर टीका केली. यावरुन शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. इंडिया विरोधकांची नाही तर विनाशाची आघाडी आहे. युपीएची लाज वाटत होती म्हणून इंडिया आघाडी नाव ठेवलं, असा घणाघात त्यांनी केला. यादरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालिसाचे पठणही केले.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, एकेकाळी महाराष्ट्रात हनुमान चालिसा वाचण्यास बंदी होती. त्यांच्या भाषणादरम्यान एका महिला खासदाराने त्यांना विचारले की तुम्हाला हनुमान चालीसा माहित आहे का? या प्रश्नानंतर श्रीकांतने घरातच हनुमान चालिसाचे पठण सुरू केले. त्यांनी सुमारे 30 सेकंद हनुमान चालिसाचे पठण केले.
तसेच, युपीए नावाची लाज वाटत होती, म्हणून विरोधकांनी इंडिया आघाडी असं नाव ठेवलं. काँग्रेसच्या काळात देशात भ्रष्टाचार आणि दहशतवाद फोफावला. काँग्रेसच्या काळात अनेक ठिकाणी बाँबस्फोट झाले, तेव्हा गप्प का होता? काँग्रेसच्या सत्ताकाळात मुंबई, मालेगाव, पुणे, हैद्राबादमध्ये बॉम्बस्फोट झाले, तेव्हा गप्प का होता? असा खडा सवाल त्यांनी केला आहे. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची यादी A to Z वाचली तरी कमी पडेल, अशी टीकाही त्यांनी केली.
खुर्चीसाठी ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आघाडी केली. ठाकरेंनी खुर्चीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आघाडी केली. ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम केलं, असा निशाणाही श्रीकांत शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे.