नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. केंद्र सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात अध्यादेश चर्चेसाठी मांडलेला आहे. यावर बोलतांना सुप्रिया सुळे यांनी चांगल्याच आक्रमक झालेल्या दिसल्या. सुळेंनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या नेत्यांनी एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी, असे म्हंटले होते. मग, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत कशी काय, असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे.
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन भाजपने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. पण. केंद्रात सरकार आल्यानंतर भाजप या घोषणेची पूर्तता करू शकलं नाही. त्यामुळे भाजप सरकारने हा जुमला होता असे मान्य करावे आणि माफी मागावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच, गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं जम्मू-काश्मीरमध्ये एक वर्षात निवडणुका घेऊ, चार वर्षे झाले निवडणुका झाल्या नाहीत, असेही त्यांनी म्हंटले आहे.
भाजपाकडून कायमच आमच्यावर घराणेशाहीचा मुद्दा घेऊन टीका केली जाते. हे मला मान्य आहे मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला अभिमान आहे. पण भाजपा खासदार, आमदारांची पहिली, दुसरी आणि तिसरी पिढी राजकारणात झाली ते चालतं. मात्र आम्ही केलं तर ती घराणेशाही असते, असा निशाणा सुप्रिया सुळे यांनी मोदी सराकारवर साधला आहे.
आमच्या मतदार संघात येऊन भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी, असे म्हंटले होते. मग, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेत कशी काय, याचे मला उत्तर पाहिजे आहे. आम्ही तुमच्या बरोबर आलो तर चांगले आणि विरोधात गेलो तर आम्ही वाईट असं नसतं. ही लोकशाही आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.