मुंबई : काही दिवसांपूर्वी गुजरातमधील जैन धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या पालीताना तीर्थ याठिकाणी काही समाजकंटकांकडून जैन मंदिरातील पुरातन धार्मिक वास्तूची तोडफोड करण्यात आली. या घटनेचा सर्व स्तरावर निषेध नोंदवला जात आहे.
यासंदर्भात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांनी राज्यपालांच्या माध्यमातून गुजरात सरकारने या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
गुजरातमध्ये भारत तसेच जगभरातील जैन धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या पालीचरण तीर्थ याठिकाणी काही समाजकंटकांनी जैन मंदिरात पुरातन धार्मिक वास्तूची तोडफोड केली. याठिकाणी वारंवार जैन धर्मीय समुदायास इतर असामाजिक तत्वाकडून त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच, जैन धर्मीय लोकांची मालकी असणाऱ्या पालीचरण डोंगरावरती अतिक्रमण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे.
गुजरात सरकारला विनंती आहे की, उपरोक्त प्रकरणातील दोषींवर तात्काळ कार्यवाही व्हावी आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेण्यात यावी, अशी पत्राद्वारे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपालांकडे मागणी केली.
या भेटीत दोषींवर कारवाई व्हावी म्हणून राज्यपालांनी गुजरात सरकार आणि तिथल्या प्रशासनाशी बोलण्याचे आश्वासन दिले आहे.