राजकारण

फडणवीस, सांभाळा! ठाकरे गटाकडून घणाघात, दिल्लीने त्यांचे राजकीय श्राद्ध...

पंतप्रधान मोदी यांनी मी पुन्हा येईलची घोषणा केली. आणि पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीसांची चर्चा सुरु झाली आहे. याचवरुन सामना संपादकीयमधून ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीसांवर जोरदार प्रहार केला.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी पुन्हा येईलची घोषणा केली. आणि पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीसांची चर्चा सुरु झाली आहे. याचवरुन सामना संपादकीयमधून ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीसांवर जोरदार प्रहार केला. झोपलेल्यांना जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेऊन पडलेल्यांना जागे कसे करायचे, हा प्रश्न नेहमीच असतो. महाराष्ट्रात सध्या हा प्रश्न निर्माण झाला आहे तो भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत. एक आपले मुख्यमंत्री, ते सहसा झोपत नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस, ते सदैव अर्धग्लानी अवस्थेत आहेत. फडणवीस सांभाळा, असा सल्लाच ठाकरे गटाने दिला आहे.

फडणवीस मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते, परंतु काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच, असे फडणवीस यांनी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा सांगितले आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था आहे. फडणवीस म्हणतात, ‘‘पहा, मी पुन्हा आलो.’’ हे सत्य नाही. ते अजिबात आलेले नाहीत, तर दिल्लीने त्यांचे राजकीय श्राद्ध घालण्याचा प्रयोग केला. फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी, कर्तबगार नेत्याला ‘बिनपगारी उपअधिकारी’ करून टाकले. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वच बाबतीत व क्षेत्रांत चिंतेची स्थिती निर्माण झाली, अशी जोरदार टीका ठाकरे गटाने केली आहे.

फडणवीस हे भांबावलेल्या मनःस्थितीत असल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनली आहे. तरुण मुली व महिलांवर दिवसाढवळय़ा भररस्त्यांवर हल्ले होत आहेत. खुनाखुनी सुरू आहे. त्यावर बोलायचे सोडून गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी ‘पुन्हा पुन्हा पुन्हा’चे तुणतुणे वाजवणे सुरू ठेवावे हे योग्य नाही. फडणवीस ‘उप’ म्हणून पुन्हा आले. ते ‘उप’पददेखील संपूर्ण नाही. आता दिल्लीश्वरांनी अजित पवारांनादेखील ‘उप’ करून फडणवीसांची अवस्था बिकट केली. ‘‘मी पुन्हा पुन्हा पुन्हा ‘उप उप उप उप’ म्हणून आलो’’ हे घोषवाक्य अजित पवारांना शोभते. पुन्हा ज्या पवारांना फडणवीस चक्की पिसायला पाठवणार होते, त्यांना बाजूला बसवून ते काय आता सत्यनारायणाची पूजा सांगत आहेत, असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ची नशा ही देशी बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस सांभाळा, असा सल्लाही ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू