उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर मी दिल्लीमध्ये आलेलो नव्हतो. माजी खासदार तर मला घरी येऊन भेटतच असतात. त्यांना देखील मला इथं येऊन भेटायचं होते. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची अधिकृत बैठक झालेली नव्हती. मी असं ठरवलं की, अधिवेशन सुरु आहे. सर्व पक्षाचे प्रमुख नेते इंडिया आघाडीचे इथं आहेत,जसे जमेल तसे सर्वांना भेटावं. लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पुढे आपण आणखी कसं जाऊ शकतो. त्याच्यावर एक चर्चा करावी. काही दिवसांमध्ये महाराष्ट्राची पण निवडणूक होणार आहे. तर त्याबाबतीत एक इंडिया आघाडी म्हणून आपण लढायला पाहिजे. एकमेकांचे सहकार्य आपण कसं घेऊ शकतो. याच्यावरती देखील चर्चा होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते.
जगभर आपण पाहिलं. तर बऱ्याच ठिकाणी जनतेचा संयम सुटत चाललेला आहे. इस्रायलमध्येसुद्धा लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. आता बांगलादेशमध्ये तशी परिस्थिती झाली. सर्वसामान्य जनता ही सगळ्यात मजबूत असते. तिच्या सहनशिलतेचा अंत कोणत्याही राज्यकर्त्याने पाहू नये. तो जर का पाहिला तर जनतेचं न्यायालय हे काय असतं हे वेळोवेळी अगदी काल बांगलादेशातल्या घटनेनंतरसुद्धा जनतेनं दाखवून दिलेलं आहे. केंद्र सरकारने ताबडतोब पाऊल उचलून तिथल्या हिंदूंचे रक्षण केलं पाहिजे. ही जबाबदारी पूर्णता आपल्या केंद्र सरकारची आहे. जर शेख हसिनांना तुम्ही इकडं आसरा देत असाल तर बांगलादेशमधल्या या हिंदूंची रक्षा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे.
यासोबतच धारावीच्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी धारावीच्या विकासाआड आलेलो नाही. धारावीकरांना तिथल्यातिथे घर मिळालंच पाहिजे. ही आमची आग्रहाची मागणी आहेच आणि धारावीच्या लोकांना अपात्र ठरवून मुंबईमध्ये एका धारावीच्या वीस धाराव्या करण्याचा डाव अदानींच्यामार्फत केला जात आहे तो आम्ही होऊ देणार नाही. मुंबईची विल्हेवाट कोणी आलं तरी आम्ही लावू देणार नाही. धारावीकरांच्या घरामध्ये रोजगार आहेत, प्रत्येकाचे काहीना काही व्यवसाय आहेत, त्या व्यवसायाची सोय ही त्या योजनेमध्ये असायला पाहिजे. धारावीच्या आराखडाच अजून झालेला नाही. तो जनतेसमोर आलेला नाही आहे.
दरम्यान विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या भेटीबाबत ठाकरे म्हणाले की, विशाल, विश्वजीत, चंद्रहार ही तरुण तरुण मुलं आहेत. कुठे काही चूक झाली तर मनात डूक धरुन ठेवणारा मी नाही आहे. त्यावेळेला जे घडायला नको ते घडलं, पण तरी एक गोष्ट नक्की की आम्ही भाजपचा पराभव हा तिकडे केला. भले आम्ही वेगळे लढलो. माझा चंद्रहार पराभूत झाला. पण भाजपा जिंकला नाही. विशाल जरी आता महाविकास आघाडीच्या परिवारामध्ये येत असेल आणि पुढच्या विधानसभा असतील आणि पुढच्या वाटचालीमध्ये झालेल्या चुका पुन्हा होणार नसतील अशी जर का त्यांनी जर मला ग्वाही दिली असेल आणि खात्री दिली असेल. एकत्र आम्ही राहूच. असे उद्धव ठाकरे म्हणाले.