केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची घटना काही वेळापूर्वी समोर आली होती. छेड काढलेल्या टवाळखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी रक्षा खडसे यांनी केली आहे. याबाबत त्या खूपच आक्रमक झालेल्या बघायला मिळाल्या. या प्रकरणामध्ये पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एकाला ताब्यातदेख घेतले आहे. इतर आरोपींचा तपास आता पोलिस करत आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले.
या मुलांचे गैरवर्तन लक्षात येताच सुरक्षारक्षकांनी त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांबरोबही त्या मुलांची झटापट झाली. या सगळ्या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. मात्र अद्याप टवाळखोरांना अटक न झाल्याने रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान तरुण मोकाट असल्याने रक्षा खडसे यांनी पोलिसांना जाब विचारला. यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी अनिकेत भोई,पीयूष मोरे, सोम माळी,अनुज पाटील किरण माळी या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.