राजकारण

दुष्काळ जाहीर करताना सरकारचे राजकारण, 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे; वडेट्टीवारांचा आरोप

राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अशात, विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु हा दुष्काळ जाहीर करत असताना सरकार राजकारण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यापैकी जवळपास 33 ते 35 तालुक्यांचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असून त्यात काही मंत्र्यांचेही तालुके आहेत. विरोधी पक्षातील आमदारांच्या फक्त चार ते पाच तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला आहे. सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनेशी हा खेळ सुरू असून दुष्काळ जाहीर करताना सरकारने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दुष्काळ जाहीर केला की, सत्ताधारी आमदारांना खुश करण्यासाठी हा दुष्काळ जाहीर केला, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारने निकषाच्या खेळात शेतकऱ्यांना भरडून राजकारण केले आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करताना केलेला राजकीय भेदभाव अत्यंत खेदजनक आहे. किमान सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नये. परंतु, सरकारने तीन पक्षाच्या आमदारांना खुश ठेवण्यासाठी घेतलेले हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना आहे. उदाहरणार्थ जत तालुक्यात टँकर सुरू असून पाण्याची प्रचंड टंचाई आहे. पण, यासारख्या अनेक तालुक्यांना डावलून सरकारने हा जुलमी निर्णय घेतला आहे. या रोषातूनच जतमध्ये गाड्यांची तोडफोड केल्याचे वृत्त समोर आले. सरकारचे शेतकऱ्यांवरचे बेगडी प्रेम आता उघड झाले आहे.

पीकविमा कंपन्यांचे लाड पुरविण्याचे सरकारचे धोरण शेतकऱ्यांना संकटात टाकणारे आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी भरडणार असून पीकविमा कंपन्यांचाच फायदा होणार आहे. सरकारने राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर केला पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचे जगणे अवघड होणार आहे. राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना, सामान्य माणसाला न्याय द्यावा, अशी मागणी आम्ही वारंवार केली. परंतु संवेदना गमावलेल्या सरकारने शेवटी राजकारण केलेच, अशी खरमरीत टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा