थोडक्यात
मराठवाड्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे
लातूरमध्ये भूगर्भातून मोठा आवाज झाला
दोन तासांच्या कालावधीत भूगर्भातून पाच वेळा जोरदार आवाज ऐकू आला
(Latur) मराठवाड्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कलांडी, खडक उमरगा आणि डांगेवाडी या गावांमध्ये एक वेगळीच घटना घडली. अवघ्या दोन तासांच्या कालावधीत भूगर्भातून पाच वेळा जोरदार आवाज ऐकू आला. या आवाजासोबत जमिनीला कंप जाणवल्याचा अनुभव नागरिकांनी घेतल्याने संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनेक गावकरी घराबाहेर पळाले आणि पावसातच रस्त्यावर रात्रभर थांबले. काहींनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप नागरिकांनी केला. घरांच्या भिंती हलल्याची जाणीव झाल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर असल्याचं ग्रामस्थांचे म्हणणं आहे.
गावकऱ्यांमध्ये या घटनेमुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. काहींनी भूगर्भातील हालचालींमुळे हे आवाज होत असल्याचा अंदाज व्यक्त केला, तर काहींनी संभाव्य भूकंपाची भीती व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून तज्ज्ञांची तपासणी करून योग्य माहिती द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सध्या या गावांमध्ये भीतीचं वातावरण असून, स्थानिक प्रशासनाकडून तातडीने तपासणी करून परिस्थितीबाबत स्पष्टता देण्याची गरज आहे. आगामी काळात अशीच घटना पुन्हा होऊ नये यासाठी नागरिकांना वेळेवर माहिती आणि आश्वासन देणं अत्यावश्यक ठरणार आहे