( Maharashtra Heavy Rain ) महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. राज्यभरात वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक गंभीर स्थिती नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळाली, येथे पूरस्थितीत नऊ जणांचा बळी गेला. मुंबईत भिंत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर इतर काही भागांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी जेवणा खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरज भासल्यास लष्कराची मदत घेण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईत मिठी नदीची पातळी धोक्याच्यावर गेली असून नदीकाठच्या नागरिकांना इशारा देण्यात आला आहे.
कोकणपट्ट्यातही पावसाचा जोर कायम आहे. रायगड जिल्ह्यातील अंबा नदी आणि रत्नागिरीतील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि कोकण परिसरात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील रेल्वे सेवाही मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे.
हवामान खात्याने पुढील 24 तास राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मंत्री महाजन यांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आणि पर्यटन टाळण्याचं आवाहन केलं आहे. प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून बचावकार्य सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.