(Maharashtra Heavy Rain ) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे.
अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पुढील 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट रेड अलर्ट देण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोलीत आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबतच सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे शहर, कोल्हापूर, गडचिरोली, तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.