थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुका येत्या काही दिवसांत जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने महापालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी ७४ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. यात मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्रपणे ३६ कोटींची तरतूद करण्यात आली असून, सत्ताधारी महायुती निवडणुकीत ‘विकासाच्या मुद्द्यावर भर देणार आहे. हा निधी रस्ते, पाणीपुरवठा, गटार, मलनिस्सारण वाहिन्या आणि इतर मूलभूत सुविधांसाठी वापरला जाणार आहे.
मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित करून शहरासाठी १८ कोटी आणि उपनगरांसाठी १७ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. कोकण विभागात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, निजामपूर, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या महापालिकांसाठी एकूण १७२ कोटी मंजूर झाले असून, त्यापैकी ४३ कोटींचा निधी वितरित झाला आहे.
पुणे विभागात पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आणि सोलापूरसाठी ९० कोटी मंजूर झाले असून २२ कोटी ५० लाख वितरीत झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड-वाघाळा यांसाठी १३.६५ कोटी मंजूर झाले असून ३ कोटी ४१ लाख वितरीत झाले आहेत.
नाशिक विभागात नाशिक आणि धुळे महापालिकांसाठी १३० कोटी मंजूर असून ३ कोटी २५ लाखांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे निवडणुकांपूर्वी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महापालिकांना बळकटी मिळेल आणि विकासकामांना गती येईल.
महाराष्ट्र सरकारने १३ महापालिकांना ७४ कोटी रुपये निधी वितरित केला
निधीचा वापर रस्ते, पाणीपुरवठा, गटार आणि अन्य पायाभूत सुविधा उभारणीसाठी होणार
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांना निधीची तरतूद
निवडणुकीपूर्वी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण आणि विकासकामांना गती