राज्यात हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून मागील काही आठवड्यांपासून राजकीय वातावरण तापले होते. अखेर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतल्याने शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेने मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन केलं. वरळीतील डोम येथे झालेल्या या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केंद्र सरकार व भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीसाठी युतीचेही संकेत देण्यात आले.
या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी सोशल मीडियावरून दोन्ही नेत्यांवर तीव्र टीका केली. शेलार म्हणाले, “हा मेळावा भाषेसाठी नव्हता, तर निवडणूकपूर्व जाहिरात होती. घाबरलेल्या उबाठा सेनेला आता ‘भाऊबंदकी’ आठवली आहे.” त्यांनी हेही विचारलं की, “जेव्हा पंतप्रधान मोदींनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, तेव्हा हे नेते गप्प का होते?”
शेलार यांनी दोघांचं भाषण फोल असल्याचं म्हणत टीका केली. “उद्धव ठाकरेंचं भाषण अप्रासंगिक, तर राज ठाकरेंचं भाषण अपूर्ण होतं. त्रिभाषा सूत्र काय आहे, कुठून आलं, याची त्यांना माहिती नाही. गुगल केलं असतं, तर कळलं असतं,” असा टोला त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले, “इंग्रजीबाबत बोलताना राज ठाकरेंना पोटशूळ उठतो. बारामतीपासून कळव्यापर्यंतचे सगळे एकत्र आले, तरी यांना सत्ता परत मिळणार नाही. उद्या हेच लोक ईव्हीएमवर शंका घेतील. घाबरलेले लोक अंधारात हात पकडून चालतात.” “टोमणे मारणं ही उद्धव ठाकरेंची जुनी शैली आहे. पण लोक आता समजूतदार झाले आहेत. दोघांच्या भाषणात प्रामाणिकपणा नव्हता. हा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे राजकीय अभिनय होता,” अशा शब्दांत शेलारांनी जोरदार हल्ला चढवला.