शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की, “राणे यांच्या कार्यकर्त्यांकडून मला शिवीगाळ केली जात आहे आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. माझं काही बरं-वाईट झाल्यास त्यास जबाबदार नारायण राणे असतील.”
यावर उत्तर देताना नारायण राणे यांचे पुत्र व भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रकाश महाजन यांच्यावर पलटवार केला. “मी कोणत्याही चिरीमिरी लोकांना ओळखत नाही. मी फक्त स्वर्गीय प्रमोद महाजन यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ओळखतो,” असे नितेश राणे म्हणाले.
प्रकाश महाजन यांनी पुढे म्हटले, “तुम्ही केंद्रीय मंत्री, खासदार असूनसुद्धा एका सामान्य माणसाला धमक्या देता? मी राज ठाकरे यांचा सैनिक आहे. कधी सभ्यता सोडून कोणावर टीका केली नाही. पण जर तुम्हाला माझ्या शब्दांमुळे एवढा राग आला असेल, तर याचा अर्थ मी खरे बोललो.”
त्यांनी राणे यांना उद्देशून म्हटले की, “तुमचे राज ठाकरे साहेबांशी सांगण्या पलीकडचे संबंध आहेत असे तुम्ही म्हणता, तर मग तुमच्या पुत्राला आवर घालणे हे तुमचे कर्तव्य नाही का?” या साऱ्या वादावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. “लोकशाहीत टीका झाली तर प्रतिक्रिया मिळणारच, ती सहन करण्याची राजकीय ताकद असली पाहिजे,” असा टोला प्रकाश महाजन यांनी लगावला.