(Rain Update ) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे.
अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र मधील प्रामुख्याने घाट परिसर, मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्यात प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भागात आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे.
नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, सोलापूर, धाराशिव आणि लातूर येथे जोरदार पाऊस होईल. यासोबतच खान्देश व मराठवाड्यातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. पुढील 24 तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यात तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय