(Rain Update ) मे महिन्यात सुरुवात झालेल्या पावसाच्या तडाख्यानंतर जूनमध्येही राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने 12 जून पासून विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील 24 तासांत कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यांचा वेग 40 ते 50 किमी/तास इतका असू शकतो. त्यामुळे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
तसेच सोलापुरात तापमानात घसरण होऊन कमाल तापमान 28°C पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. जोरदार पावसाची शक्यता असल्याने याठिकाणीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सांगलीतही पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज आहे. गडगडाटी पावसामुळे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यातही गेल्या 24 तासांत कमाल तापमान 30.7°C नोंदवले गेले आहे. आज हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, कमाल तापमान 30°C च्या आसपास राहण्याची शक्यता आहे. येत्या शनिवारीपासून मध्य आणि पूर्व भारतात मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे, विजांच्या गडगडाटादरम्यान बाहेर न पडणे, झाडाखाली थांबणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.