(Maharashtra School Reopen )राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज, 16 जूनपासून होत आहे. विदर्भ वगळता राज्यभरातील शाळांमध्ये आजपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा ऐकायला मिळणार आहे. यंदा शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे खास स्वागत करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील कोडोली शाळेत तर अजित पवार यांनी बारामती जवळील काटेवाडीच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केलं. शाळेच्या नव्या वर्षाची सुरुवात अधिक उत्साही व्हावी यासाठी राज्य सरकारच्या वरिष्ठ पातळीवरून सहभाग घेतला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने यंदा शालेय पास थेट शाळांमधूनच वाटप करण्याची योजना राबवली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना बस स्थानकांवर रांगा लावण्याची गरज भासणार नाही आणि त्यांचा वेळ वाचणार आहे.
शाळांमध्ये फुगे, फलक, रंगीबेरंगी सजावट, स्वागत गीत, गुलाबपुष्प व मिठाई यांसह विविध कार्यक्रमांचाही आयोजन करण्यात आले आहे. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व शाळा व्यवस्थापन समिती या स्वागतासाठी सज्ज आहेत.