(Onion Purchase From Farmers ) पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची केंद्रिय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मागणी केली.
कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कोकाटे आणि रावल यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली होती.
या बैठकीमध्ये किरकोळ बाजारात कांद्याचा दर 40-45 रुपये किलोपर्यंत गेला तरच निर्यात शुल्क लावावे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळू शकेल, 2025-26 मध्ये 6 लाख मेट्रिक टन कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून डिबिटी (DBT) प्रणालीद्वारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, तसेच राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ यांनी थेट शेतकऱ्यांकडून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा, मध्यस्थांची भूमिका कमी करावी. अशा अनेक मागण्या केल्या असून मागण्या मान्य झाल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.