हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी जनतेने एकत्र येत सरकारला झुकवले आणि त्यानंतर मुंबईत भरविण्यात आलेल्या मराठी माणसाच्या विजयी मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या ऐतिहासिक मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात काही महत्त्वपूर्ण घटकांचा उल्लेख राहून गेल्याची कबुली देत दिलगिरी व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांनी सांगितले की, “हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, विविध दबावगट, तसेच काही मोजके कलाकार ठामपणे उभे राहिले. या सर्वांचा उल्लेख माझ्या भाषणात करणे गरजेचे होते, मात्र ते राहून गेले याची मला खंत आहे. मी याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.”
त्यांनी पुढे नम्रपणे सर्वांचे आभार मानताना म्हटले, “मराठी अस्मितेसाठी झालेली ही एकजूट अशीच कायम राहो, हीच अपेक्षा. या लढ्यात ज्यांनी ज्यांनी मोलाचे योगदान दिले, त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आभार.”
राज ठाकरे यांच्या या संवेदनशील आणि आत्मपरीक्षणशील भूमिकेचे अनेक स्तरांवरून स्वागत होत आहे. भाषणात उल्लेख न झाल्याने दुखावले गेलेल्यांनाही हे वक्तव्य दिलासा देणारे ठरत आहे.