( Weather Update ) राज्यात काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे.भारतीय हवामान विभागाने या भागांतील अनेक जिल्ह्यात पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी तसेच दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस बहुतांश विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. यासोबतच राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी विजांचा कडकडाट पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.