थोडक्यात
महाविकास आघाडी व मनसेच्या नेत्यांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट
एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया
महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड यश मिळवेल
(Eknath Shinde) महाविकास आघाडी व मनसेच्या नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, "तक्रारीचा पाढा वाचण्यासाठी ते आलेले आहेत. महाविकास आघाडी नाही ही महाकन्फ्यूज आघाडी आहे. कोण काय बोलतंय त्यांचे त्यांनाच समजत नाही आहे. ही महाकन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे. राज्य सरकार ज्या पद्धतीने आज काम करते आहे. शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली. त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे."
"लोकसभा आणि विधानसभेमधला जो विजय त्यांनी पाहिला आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीने केलेले काम आणि त्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही. समोर पराभव दिसू लागला आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जेव्हा पराभव समोर दिसू लागतो त्यावेळी अशाप्रकारच्या तक्रारी माणसं सुरु करतात."
" जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीला विजय मिळाला त्यावेळी तक्रारीचा पाढा कधीच वाचला नाही जेव्हा जेव्हा पराभूत झाले तेव्हा तक्रारींचा पाढा वाचला. आतासुद्धा त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभव दिसू लागला आहे म्हणून हा रडीचा डाव खेळण्यासाठी ते आलेले आहेत. पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहेत. ते कितीही काही एकत्र आले तरीसुद्धा महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड यश मिळवेल" असे एकनाथ शिंदे म्हणाले.