कोकणातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या मालवण आणि कणकवली नगरपरिषद निवडणुकांचे निकाल अखेर स्पष्ट झाले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या बहुचर्चित लढतीत कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी निर्णायक बाजी मारली आहे. ‘राणे विरुद्ध राणे’, ‘शिवसेना विरुद्ध भाजप’ आणि ‘स्थानिक सत्ता विरुद्ध संघटनात्मक ताकद’ अशा अनेक पातळ्यांवर लढवली गेलेली ही निवडणूक केवळ नगरपरिषदांपुरती मर्यादित न राहता कोकणातील आगामी राजकीय समीकरणांची दिशा दाखवणारी ठरली आहे.
निवडणूक नव्हे, तर राजकीय कसोटी
मालवण आणि कणकवली या दोन्ही नगरपरिषदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील केंद्रे मानली जातात. या निवडणुकीत निलेश राणे यांचा थेट सामना त्यांचेच भाऊ नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजप गटाशी होता. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सक्रिय भूमिका, शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप असा स्पष्ट संघर्ष आणि प्रचारादरम्यान पैसे वाटपाचे आरोप, रोख रक्कम जप्तीचे प्रकार यामुळे ही निवडणूक अधिकच तापली.
निकाल लागल्यानंतर मात्र चित्र स्पष्ट झाले, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपवर मात करत कोकणात आपली पकड अधिक घट्ट केली. ‘हा माझा नाही, शिवसैनिकांचा विजय’ विजयानंतर प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांनी श्रेय स्वतःकडे न घेता कार्यकर्त्यांकडे वळवले. “हा खरा विजय सहकाऱ्यांचा आणि प्रत्येक शिवसैनिकाचा आहे. शिंदे साहेबांनी दिलेला आशिर्वाद, मार्गदर्शन आणि पाठिंबा या विजयामागे आहे. जिल्हाप्रमुखांपासून शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाने रक्ताचं पाणी केलं,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
नगरपरिषद जिंकल्यानंतर शहर विकासाबाबतची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “जनतेने विश्वास टाकलाय. 21 व्या शतकाला साजेसं शहर घडवण्यासाठी जी पावलं उचलावी लागतील, ती पारदर्शकपणे उचलली जातील.”
संघर्ष झाला, पण परिवार कायम
या निवडणुकीत मित्रपक्ष भाजपसोबत थेट संघर्ष झाल्याची कबुली देत असतानाही निलेश राणेंनी शब्दांची धार संयमित ठेवली.
“निवडणूक जिंकण्यासाठी जे करावं लागतं, ते प्रत्येकजण आपल्या परीने करतो. भाजप माझ्यासाठी वेगळा नाही. मरेपर्यंत भाजपला वेगळं मानू शकत नाही. तोही आमचा परिवार आहे,” असं सांगत त्यांनी राजकीय संघर्ष आणि कौटुंबिक नातेसंबंध यामधील सीमारेषा ठळकपणे अधोरेखित केली.
“आज निवडून आलो, हा जनतेचा विजय आहे. परिवार तसाच अबाधित राहणार,” हे विधान अनेक राजकीय चर्चांना पूर्णविराम देणारं ठरलं आहे.
आनंदही आहे, दु:खही…
कणकवली नगरपरिषदेत शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले, तर भाजपचे समीर नलावडे पराभूत झाले. या निकालावर प्रतिक्रिया देताना निलेश राणेंनी दुहेरी भावना व्यक्त केल्या.
“एका बाजूला आनंद आहे, तर दुसऱ्या बाजूला दु:खही आहे. आमच्याच परिवारातील लोकांचा पराभव झाला, त्याचं दु:ख आहे. कोणाचा पराभव साजरा करणारा मी माणूस नाही,” असं म्हणत त्यांनी विजयाला मानवी संवेदनांची किनार दिली.
‘२० पैकी २०’ स्वप्न अपूर्ण
मालवण नगरपरिषदेत शिवसेनेचे 10, भाजपचे 5 आणि उबाठा गटाचे 5 सदस्य निवडून आले. अपेक्षित निकालाबाबत विचारले असता निलेश राणे म्हणाले,
“20 पैकी 20 जागा जिंकण्याचा आमचा इरादा होता. कुठे कमी पडलो, याचं चिंतन नक्कीच करू.”
मंत्रिपदाच्या चर्चांवर मिश्कील उत्तर
या मोठ्या विजयामुळे निलेश राणेंना मंत्रिपद मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र यावर त्यांनी राजकीय परिपक्वतेचं आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचं दर्शन घडवत उत्तर दिलं,
“माझ्या घरात नितेशच्या रूपाने एक मंत्री आहे. त्यात मी समाधानी आहे.”
कोकणातील राजकारणाची पुढची दिशा?
मालवण–कणकवलीचा हा निकाल केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरता मर्यादित न राहता, आगामी जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या राजकारणावर प्रभाव टाकणारा ठरणार आहे. युती, संघर्ष आणि परिवार या त्रिसूत्रीभोवती फिरणारं कोकणाचं राजकारण आता नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचं स्पष्ट संकेत या निकालातून मिळत आहेत.