थोडक्यात
मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली
दोघांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतले
अंतरवाली सराटीत घेतली पत्रकार परिषद
(Manoj Jarange Patil ) मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी दोघांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. दोघे संशयित बीड जिल्ह्यातल्या गेवराई येथील असल्याची माहिती मिळत आहे.
दोघांनी जरांगे यांना धमकी देत त्यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. त्यानंतर मनोज जरांगे यांच्या एका जवळच्या सहकार्याने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली. याच पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "बीडचा एक कार्यकर्ता एका आरोपीकडे गेला आणि खरी सुरवात झाली. मला जीवे मारण्याचा कट ही महाराष्ट्राला हादरवणारी घटना. मी याच्या मुळागाळात जाणार आहे. मराठा समाज बांधवांनी शांत राहावं. जेवणात विष टाकून मारण्याचा आधी कट रचला गेला. बीडमधील कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे किंवा पीए आहे."
"धनंजय मुंडे यांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचण्याचे काम केलं आहे. मग जवळच कोण धरायचं तर मग कोणी आहे असं म्हणत शोधायला सुरुवात केली असेल. त्या बीडच्या कार्यकर्त्याने आरोपींना परळीला नेले आणि तिथे बैठक सुरु होती. ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली आणि धनंजय मुंडेंसोबत चर्चा करुन बाहेर आलेला. कांचन आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये 20 मिनिटं चर्चा झाली. धनंजय मुंडेंनी हे करायला सांगितले हे दोन आरोपींना माहित होते."
"याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे. मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील झाली. भाऊबीजेच्या दिवशी हे आरोपी पुन्हा त्यांना हा कट शिजवला. यामध्ये खूप जण आहेत. हे करणाऱ्यापेक्षा यामध्ये मूळ धनंजय मुंडे आहे. ही असली वृत्ती राज्याला, गावाला शोभणारी नाही. अशाने राजकारण होत नसते. घातपात करुन माणूस राजकारणात मोठा होत नाही. मुख्यमंत्री साहेब तु्म्हाला सांगतो असला राज्याच्या नाश करणाऱ्याचा शेवट करा, याला चौकशीला घेऊन याची चौकशी करा. आरोपीसोबत यांच्या बैठका झालेल्या आहेत. धनंजय मुंडेंनी सामूहिक कट रचलेला आहे. खून करायचा, घातपात करायचा, गोळ्या, औषध देऊन घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे आहे. ज्यांना ताब्यात घेतलं आहे त्यांना सोडलं तरी माझं काही म्हणणं नाही आमच्या जनतेच्या कोर्टात हे सगळं खरे झालेलं आहे. मुख्य कच रचण्याचा सुत्रधार धनंजय मुंडे आहे. " असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.