वाशिम : मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सभेतून हल्ला चढवला आहे. अजित दादा तुमचा माणूस आवरा नाही तर आमचा नाईलाज होईल. छगन भुजबळ यांच्या नादी लागलो तर त्यांची खैर नाही, असा इशाराच जरांगेंनी दिला आहे. ते वाशिम जिल्ह्यात बोलत होते.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, स्वतःच्या मुलाचे कल्याण करायचे असेल तर मैदानात उतरावे लागते आणि ते मराठ्यांना सांगण्याची गरज नाही. मराठ्यांची लाट उसळली आणि बऱ्याच जणांच्या पोटात गोळा उठला. त्या भंगारचे ऐकता का तुम्ही? भुंगाऱ्याचे ऐकता का? मी मान-अपमान पचवत नाही, पण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शांत आहे. जशास तसे उत्तर द्यायला लावू नका.
70 वर्षांपासून मराठ्यांची मुले आरक्षणाची वाट बघत आहेत. छगन भुजबळ नीच विचारांचा सरकारमधील कलंकित माणूस आहे. अजित दादा तुमचा माणूस आवरा नाही तर आमचा नाईलाज होईल. छगन भुजबळ यांच्या नादी लागलो तर त्यांची खैर नाही. सरकारला सांगतो छगन भुजबळांना आवरा. दादागिरी केली तर भविष्यात आम्ही पण उत्तर देऊ. दांडा हातात घ्यायची भाषा करू नको, दांडा हातात घेतला तर खाली ठेवणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे
आम्ही आतापर्यंत शांत बसलो. सहन करण्याची क्षमता संपली आहे. त्यांची मस्ती उतरवण्याचे काम पुढच्या काळात मराठा समाज करणार आहे. आम्ही सुरुवात केली नाही. 24 तारखेपर्यंत शांत राहतो नंतर बघू किती दम आहे, असेही मनोज जरांगेंनी म्हंटले आहे.