म्हाडाची परीक्षा रद्द झाल्यामुळे भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभविप) कार्यकर्त्यांनी सोमवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केले. यावेळी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही त्याठिकाणी पोहोचले. त्यामुळे याठिकाणी अभविप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत अभविपच्या आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर या परिसरात अद्याप तणावाचे वातावरण आहे. यावरुन ठाण्यामध्ये आगामी काळात राष्ट्रवादी आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
त्यानंतर आता म्हाडा पेपरफुटी प्रकरणी औरंगाबादमधील तीन कोचिंग क्लासेस चालकाना अटक करण्यात आलीय. पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम शाखेने कारवाी केलीय. औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय चव्हाण आणि सक्षम अॅकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे यांना अटक करण्यात आलीय. हे तिघे त्यांच्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते अशी माहिती समोर आलीय. स्पर्धा परीक्षा क्लासेसची वाढती संख्या आणि क्रमाने स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढवण्यासाठी आता क्लासेस चालक आधीच पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी होत असल्याचे समोर आली आहे.