थोडक्यात
5354 घरे आणि 77 प्लॉटच्या सोडतीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर
11 ऑक्टोबर 2025 रोजी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संगणकीय सोडत
सोडतीत यशस्वी ठरलेली नावे व प्रतीक्षा सूची 11 ऑक्टोबरनंतर संकेतस्थळावर उपलब्ध होणार
(MHADA Lottery) म्हाडा कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (MHADA) गृहनिर्माण लॉटरी 2025 साठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतून 5,354 घरे आणि सिंधुदुर्गातील ओरोस तसेच कुलगाव-बदलापूर येथील 77 भूखंड सोडतीद्वारे उपलब्ध होणार आहेत. संगणकीय सोडत 11 ऑक्टोबर 2025 रोजी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणार आहे.
या सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्राथमिक यादी 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. अर्जदारांना 3 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन दावे व हरकती सादर करता येतील. अंतिम पात्र अर्जदारांची यादी 9 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. सोडतीत यशस्वी ठरलेली नावे व प्रतीक्षा सूची 11 ऑक्टोबरनंतर संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेत 565 घरे, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेत 3,002 घरे, इतर कोकण गृहनिर्माण योजनांतर्गत 1,746 घरे आणि 50 टक्के परवडणाऱ्या योजनेअंतर्गत 41 घरे समाविष्ट आहेत. तसेच 77 भूखंड विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
यंदाच्या सोडतीसाठी एकूण 1,84,994 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 1,58,424 अर्ज अनामत रकमेसह वैध मानले गेले आहेत. मोठ्या संख्येने अर्ज आल्यामुळे स्पर्धा तीव्र होणार असून अनेक कुटुंबांना परवडणाऱ्या घरांची संधी मिळणार आहे.