घर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रातील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या कोकण मंडळाने २०२६ मध्ये २ हजारांहून अधिक घरांची भव्य लॉटरी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये ही घरे उपलब्ध होणार असून, सामान्य मध्यमवर्गीयांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल, तर एप्रिल किंवा मे महिन्यात प्रत्यक्ष सोडत प्रक्रिया पार पडेल. मुंबई आणि उपनगरांमध्ये घरांच्या किमती आकाशाला भिडल्या असताना ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसर परवडणारे ठरत आहेत.
याच भागांत म्हाडाच्या घरांमुळे अनेकांचे स्वप्न पूर्ण होईल. गेल्या वर्षी २०२५ मध्ये अवघ्या ५ हजार घरांसाठी दीड लाखांहून अधिक अर्ज आले होते, त्यामुळे यंदाच्या लॉटरीकडे मोठी उत्सुकता आहे.
म्हाडा मुंबई मंडळाची लॉटरी पुरेशी घरे नसल्याने पुढे ढकलली गेली होती, ज्यामुळे इच्छुक नाराज झाले. आता कोकण मंडळाची ही लॉटरी अधिक महत्त्वाची ठरली आहे. यात खासगी विकासकांकडून मिळणारी १५% आणि २०% आरक्षित घरे तसेच प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत घरांचा समावेश आहे. इच्छुकांनी आतापासून तयारी सुरू करावी, असे आवाहन म्हाडाने केले आहे.