थोडक्यात
मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्घाटन
उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार दीपोत्सवाचं उद्घाटन
संध्याकाळी 6:30 वाजता दादरच्या शिवाजी पार्कात कार्यक्रम
(Uddhav Thackeray - Raj Thackeray ) मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी मनसेच्यावतीने दीपोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सातत्याने गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी होताना पाहायला मिळत आहे. या भेटींमुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत.
यातच महाविकास आघाडी आणि मनसेतील काही प्रमुख नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहायला मिळणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत. शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव सोहळ्याचे उद्धाटन 17 तारखेला होणार असून या दीपोत्सवाचे उद्धाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
संध्याकाळी 6:30 वाजता दादरच्या शिवाजी पार्कात हा कार्यक्रम होणार असून आदित्य ठाकरे देखील राहणार कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणार आहेत. बऱ्याच वर्षांनंतर ठाकरे बंधूंची ही एकत्र दिवाळी पाहायला मिळणार आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या 3 महिन्यांत 6 भेटी झाल्या असून मनसे आयोजित दीपोत्सवाचं यंदाचं तेरावं वर्ष आहे.
यासाठी उद्धव ठाकरेंचं नाव मनसेच्या दीपोत्सव पत्रिकेत छापण्यात आले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे यंदाचा हा दीपोत्सवाचा सोहळा खास असणार आहे. दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा महाराष्ट्राला एकत्र दिसणार आहेत. मनसेच्या या दीपोत्सवात वेगवेगळे कलाकारदेखील उपस्थित असतात. या कार्यक्रमात आकर्षक रोषणाई केली जाते. त्यामुळे आता या मनसेच्या दीपोत्सवाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.