गेल्या 15 दिवसांपासुन अवकाळी पावसाने मुंबईसह महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ तर उडालीच मात्र त्याबरोबर शेतकऱ्यांचे ही मोठे नुकसान झाले आहे. आज पहाटेपासून मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावलेली असतानाच आता वेळेच्या आधीच तब्बल 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे. आज हवामानखात्याने या बाबत अधिकृत घोषणा केली.
दरवर्षी मान्सून 7 जुनला महाराष्ट्रात दाखल होतो. मात्र यंदा वेळेच्या खूपच आधी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबई मध्ये ही लवकरच मान्सून दाखल होईल असं हवामान खात्याने सांगितले आहे. दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिली.
आठवड्यापूर्वीच अंदमान निकोबारसह केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याने महाराष्ट्रामध्ये ही अनुकूल वातावरण निर्माण झाले होते. मात्र तब्बल 16 वर्षानंतर पहिल्यांदाच मे महिन्यात महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झाला आहे. रविवारी मान्सून तळकोकणासह देवगड पर्यंत दाखल झाला आहे. पहाटेपासून मुंबई मध्ये संततधार सुरु आहे. पुढील तीन दिवसात अनुकुल वातावरण असल्याने मुंबई मध्ये ही लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे.
या वर्षी राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदा मान्सून च्या पावसाचं प्रमाण 107 टक्क्यांपर्यत असु शकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासुन मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसत असुन मुंबईला रेड अलर्ट तर ठाण्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.