प्रतिनिधी : प्रशांत जगताप
राज्य शासनाने पंढरपूर वारीला बंदी घालत राष्ट्रद्रोही निर्णय घेतला आहे. बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध करत सबंध वारकऱ्यांचा अवमान करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाने हे निर्णय त्वरित मागे घ्यावेत असा इशारा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुरुजी यांनी दिला आहे. राज्यात वारीचे मुक्काम असणाऱ्या सर्व ठिकाणी परिसरातील गावांनी मुक्काम करून प्रथा परंपरा पाळाव्यात. राज्य शासन याला विरोध करेल मात्र हा विरोध न जुमानण्याचे आवाहन भिडे गुरुजी यांनी वारकऱ्यांना केले आहे.
दोन दिवसापूर्वी कराड तालुक्यातील करवडी येथे बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आज कराडमध्ये दत्त चौक ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी बंडा तात्यांवरील कारवाई त्वरित मागे घ्यावी तसेच शासनाने वारी बाबत निर्णय घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करत हा निर्णय मागे घेण्याची मागणी भिडे गुरुजी यांनी यावेळी केले आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केलेली विनंती धुडकावत भिडे गुरुजी यांच्यासह त्यांचे सहकारी सकाळी साडेअकरा वाजता बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध केलेल्या ठिकाणी भेटण्यासाठी रवाना झाले आहेत.