कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत कोरोनाचे 53 संशयित रूग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क झाली असून आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याचपार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, "कोरोना वाढत आहे अशा प्रकारच्या बातमी आपण वृत्तवाहिन्यांवर पाहत आहोत. त्यामुळे सहाजिक आहे की नागरिक काळजी घेणार आणि घाबरणार. पण माझी सर्व नागरिकांना विनंती आहे. पूर्वी ज्याप्रमाणे कोरोनाची भीती होती तशी भीती बाळगण्याची गरज नाही. सर्व नागरिकांची आता प्रतिकारशक्ती ही वाढली आहे त्यामुळे आता घाबरण्याची आवश्यकता अजिबात नाही".
"पंधरा वर्षांपूर्वीच स्वाईन फ्लू सुद्धा होता त्याचे पेशंट आज सुद्धा आढळतात. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्याप्रमाणे सातत्याने सुरू आहेत. राज्य शासन सर्व प्रकारे सर्व आजारांवर उपाययोजना करण्यासाठी सक्षम आहे सुसज्ज आहे. आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा नेहमीच सज्ज असते".