मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. भाजपने पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, ठाकरे गटाकडून उमेदवारांना AB फॉर्म देण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अद्याप कोणालाही AB फॉर्म देण्यात आल्याची अधिकृत माहिती नाही. यासंदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसेच्या भूमिकेबाबत माहिती दिली.
बाळा नांदगावकर म्हणाले की, मुंबई महानगरपालिका निवडणूक ही देश, महाराष्ट्र आणि विशेषतः मराठी माणसासाठी महत्त्वाची आहे. निवडणुका येतात आणि जातात, मात्र मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याबाबत काही घटकांकडून नियोजन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे ही निवडणूक अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची आहे. मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे. मुंबई वेगळी करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त केली पाहिजेत, असेही ते म्हणाले. भांडण किंवा वाद न करता ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवायची असून, मुंबईत सत्ता कायम राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
मनसे आणि शिवसेना युतीबाबत बोलताना नांदगावकर म्हणाले की, मागील २० वर्षांत पहिल्यांदाच मनसे युतीत निवडणूक लढवत आहे. त्यामुळे युती धर्म पाळणे आवश्यक आहे. जागावाटपात काही जागा इकडच्या तिकडे होणे स्वाभाविक असून, त्यातून नाराजी निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे यांनी पक्षाच्या कोअर टीमला दिलेल्या संदेशाबाबत माहिती देताना नांदगावकर म्हणाले की, प्रत्येक जागा मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी महत्त्वाची आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांसोबत उपस्थित राहावे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोबतही उमेदवारी अर्ज भरायचे असून, प्रचारात पूर्णपणे सहभागी व्हायचे आहेत. शिवसेना–मनसेचा उमेदवार असेल, त्याला मदत करण्याचे निर्देश राज ठाकरे यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
मनसेकडून AB फॉर्म वाटपाबाबत बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, मनसेकडून AB फॉर्म दिले जातील आणि ते राजगड कार्यालयातून वाटप केले जाईल. मात्र मनसे किती जागांवर निवडणूक लढवत आहे, याबाबत त्यांनी थेट माहिती दिली नाही. AB फॉर्म दिल्यानंतर सर्व माहिती स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असू शकते, हे मान्य करत त्यांनी कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन केले. आगामी काळात ठाकरे बंधू एकत्र निवडणुका लढवत राहतील आणि त्यांचे राजकीय भविष्य उज्वल असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.