मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारपासून तीन दिवसीय वाहतूक ब्लॉक असणार आहे. महामार्गावर गर्डर बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने वाहतूक बंद रहाणार आहे. बांधकाम सुरळीतपणे पूर्ण व्हावे यासाठी महामंडळाने २२, २३ आणि २४ जानेवारी या तीन दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळेत ट्रॉफिक ब्लॉक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर कि.मी 58/500 (डोंगरगाव/ कुसगांव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू असून 22, 23 आणि 24 जानेवारी असे तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत या लांबीत ब्लॉक घेण्यात येणार आहे. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या किमी क्रमांक 54/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.
वरील तिन्ही दिवस दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरू राहणार आहे.