(Nagpur Marbat) 23 ऑगस्ट रोजी नागपूरच्या जागनाथ बुधवारी येथून ऐतिहासिक काळी-पिवळी मारबत मिरवणूक निघणार आहे. 135 वर्षांची परंपरा असलेली ही मिरवणूक शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. यंदा मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे.
सुरक्षेला प्राधान्य देत 3 हजार पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. यासोबतच संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांतून थेट देखरेख ठेवली जाणार आहे. संशयास्पद हालचालीवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
मिरवणुकीचा मुख्य आकर्षण म्हणजे मस्कासाथ आणि जागनाथ बुधवारी येथून सुरू होणारी काळी-पिवळी मारबतांची शहीद चौकात होणारी गळाभेट. या ठिकाणी मोठी गर्दी जमा होते. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी प्रत्यक्ष स्थळाची तपासणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
गर्दी व्यवस्थापन व वाहतूक नियंत्रणालाही विशेष महत्त्व दिले आहे. वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले असून, मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहील यासाठी स्वतंत्र नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी शिघ्र कृती दल (QRT), अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सेवा तत्काळ तयार ठेवण्यात आल्या आहेत.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे व नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे.