(Nagpur Pune Vande Bharat Express) नागपूरपासून पुणेपर्यंतचा प्रवास आता आणखी जलद आणि आरामदायक होणार आहे. नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ही गाडी एकूण 11 स्थानकांवर थांबणार आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना थेट लाभ होणार आहे. गाडी सुरू होण्याची अचूक तारीख अजूनही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही.
या वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा अजनी (नागपूर), वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड आणि शेवटी पुणे येथे असेल. ही गाडी सणासुदीच्या काळात आणि नियमित प्रवासासाठी उपयुक्त ठरणार आहे, कारण नागपूर-पुणे मार्गावरील मोठ्या लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 26102 (अजनी-पुणे) ही वंदे भारत एक्सप्रेस दररोज सकाळी 9:30 वाजता अजनी येथून सुटेल आणि रात्री 9:30 वाजता पुणे स्टेशनवर पोहोचेल. तर, गाडी क्रमांक 26101 (पुणे-अजनी) ही एक्सप्रेस सायंकाळी 6:30 वाजता पुण्यातून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता अजनी येथे पोहोचेल.
व्यापारी वर्ग, विद्यार्थी, नोकरदार आणि पर्यटकांसाठी ही गाडी उत्तम पर्याय ठरणार आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात आणि गर्दीच्या दिवसांमध्ये या गाडीमुळे मोठा दिलासा मिळेल.ही गाडी मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या अंतर्गत येते. तिच्या प्राथमिक देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी नागपूर येथेच पार पडणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, जळगाव, नाशिक, नगर, पुणे अशा अनेक जिल्ह्यांना या सेवेमुळे थेट फायदा होणार आहे.