थोडक्यात
उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर
उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर नवनाथ बन यांची प्रतिक्रिया
"उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा हा शेतकऱ्यांसाठी नाही, तर स्वतःचं राजकीय पीक घेण्यासाठी"
(Navnath Ban) राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे 5 दिवसीय मराठवाडाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 5 ते 9 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार असून मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत.
धाराशीव, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतनिधी देण्यात येणार होता, तर ही मदत पोचली का? याबाबतही शेतकऱ्यांशी संवाद साधून उद्धव ठाकरे आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत भेटी आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठकसुद्धा या दौऱ्यात घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या 5 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनाथ बन म्हणाले की,"उद्धवजी ठाकरे यांचा मराठवाड्यातला दौरा हा शेतकऱ्यांसाठी नाही तर स्वत:चे राजकीय पीक घेण्यासाठीचा हा दौरा आहे. देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत दिली. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होते. असे असताना नौटंकी करण्यासाठी उद्धवजी ठाकरे हा दौरा करत आहेत."
"स्वत:चे राजकीय पीक घेण्यासाठी मराठवाड्याच्या बांधावर उद्धवजी ठाकरे जात आहेत. मुख्यमंत्री असताना मराठवाड्याचा दौरा केला नव्हता, मुख्यमंत्री असताना मदत केली नव्हती. मंत्रालयात बसून होते. आज मात्र राजकीय फायदा मिळावा यासाठी ते मराठवाड्याचा दौरा करत आहेत." असे नवनाथ बन म्हणाले.