महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या दोन्ही दिग्गज नेत्यांची नाव एकत्र आली की, साहजिकच 'त्या' पहाटेच्या शपथविधीची आठवण येते. आज तर या दोन्ही दिग्गज नेत्यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे 'त्या' पहाटेच्या शपथविधीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. यातच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने शपथविधी संदर्भातील एका घटनेवर अजित पवारांची माफिनामा मागणारी पोस्टरबाजी केली आहे. इतकेच नाही तर या संदर्भातील जाहिरातही अनेक वृत्तपत्रांना दिली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. यानिमित्त आज मुंबईतील वृत्तपत्रांमध्ये अजित पवारांना शुभेच्छा देणारी हे माफीनामा वजा जाहिरात छापली आहे. मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी ही जाहिरात दिली आहे. २०१९ मध्ये घडलेल्या एका घटनेचा संदर्भ देत देशमुख यांनी, "दादा, आता सहन होत नाही," म्हणत रिटर्न गिफ्ट म्हणून माफीच द्या अशी विनंती त्याने या जाहिरातीत केली आहे.
जाहिरातीत काय ?
"दादा, तुमच्या वाढदिवसानिमित्त करतो एकच वादा झाली चूक, माफ करा. तुम्हाला दुखवण्याचा बिलकुल नव्हता इरादा. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी माझ्या हातून आयुष्यातील सर्वात मोठी चूक घडली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नको त्या घोषणा दिल्या. दादा, मी अपरपक्व होतो. भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली. दोन वर्षे मी स्वत:ला पाश्चातापाच्या अग्निकुंडात झोकून दिले आहे. पण दादा, आता सहन होत नाही. संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छारुपी आदरभाव व्यक्त करतोय. मलाही दादा आज मन मोठं करुन आशिर्वादरुपी माफीचं रिटर्न गिफ्ट द्या. एवढीच माफक अपेक्षा," असं या जाहिरातीमध्ये म्हटलं आहे.
प्रकरण काय ?
२०१९ साली महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या वेळेस २३ नोव्हेंबर रोजी पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र अवघ्या काही दिवसांनंतर अजित पवारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आणि फडणवीसांनी राजीनामा दिला. पहाटेच्या या शपथविधीवरुन बराच राजकीय गोंधळ निर्माण झालेला. त्या दिवशी राष्ट्रवादीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी नितीन देखमुख यांनी प्रतिष्ठानच्या इमारतीबाहेर अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली होती. त्यासाठीच त्यांनी आज जाहिरात छापून माफी मागितली आहे.