(Nira River ) पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे नीरा नदीला पूर आला असून परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नीरा नदीलगतच्या गावांमध्ये पूराचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत पूरग्रस्त भागांतील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. आतापर्यंत शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून त्यांच्या निवास, अन्न व इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलिस विभाग आणि स्वयंसेवी संस्था पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्क आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच आपत्तीच्या स्थितीत सुरू असलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, रविवार रात्री 9:30 वाजेपर्यंतच्या पावसाच्या नोंदीनुसार दौंडला सर्वाधिक 98 मिमी, लोणावळ्याला 76 मिमी, तर बारामतीत 49.5.मिमी पाऊस झाला आहे. इतर भागांमध्ये देखील वडगावशेरी (34 मिमी), निमगिरी (28मिमी), हडपसर (25 मिमी) आणि कोरेगाव पार्क (5 मिमी) अशा प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.