रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा नीता अंबानी यांनी कर्करोग रुग्णांसाठी रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या ‘जीवन’ या नव्या शाखेचे उद्घाटन केले. हे रुग्णालय त्यांनी आपल्या दिवंगत वडील रवींद्रभाई दलाल यांच्या स्मरणार्थ समर्पित केले. उद्घाटनप्रसंगी मुकेश अंबानी उपस्थित होते. यावेळी पूर्णिमा दलाल, ममता दलाल तसेच अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांनीही सहभाग घेतला.
नीता अंबानी काय म्हणाल्या?
रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी नीता अंबानी यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “‘जीवन’ हे माझ्या वडिलांना अर्पण केलेले एक श्रद्धास्थान आहे. त्यांनी मला नेहमी सेवा आणि करुणेचे महत्त्व शिकवले. समाजाची निस्वार्थ सेवा हीच खरी भक्ती असल्याचा संस्कार त्यांनी माझ्यावर केला,” असे त्या म्हणाल्या.
लाखो लोकांना नवीन जीवन मिळाले
मुंबईतील रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त नव्या शाखेची पायाभरणी करण्यात आली. नीता अंबानी यांनी सांगितले की, दहा वर्षांपूर्वी परवडणारी व जागतिक दर्जाची आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू झाले. गेल्या दशकात ३.३ दशलक्ष रुग्णांना, त्यात १.६ दशलक्ष मुलांचा समावेश, नवसंजीवनी मिळाली.
सुविधा काय असतील?
रुग्णालयाच्या नव्या विभागात केमोथेरपी, इम्युनोथेरपीसह अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच डायलिसिस सेवाही येथे दिली जाणार असून रुग्णांच्या देखरेखीकरिता २४ तास तज्ज्ञ वैद्यकीय पथक कार्यरत राहील. ‘जीवन’ हॉस्पिटलमध्ये मुलांसाठी स्वतंत्र केमोथेरपी वॉर्ड असून तो बालसुलभ वातावरणात, रंगीबेरंगी व निसर्गचित्रांनी सजवलेला आहे.