सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारतर्फे मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यापुढे महाराष्ट्रात येण्यासाठी कोरोना चाचणी आवश्यक नसण्यासंबंधी प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यासाठी संबंधित व्यक्तीला लसींचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ पर्यंत वाढवल्याचे सांगितले. तसेच अन्य काही घोषणाही केल्या.
राज्यातील नव्या नियमांबद्दल बोलताना टोपे यांनी निर्बंधामध्ये कोणतीही शिथिलता देणार नसल्याचे सांगितले. याउलट ज्या भागात कोरोना नियमांचे उल्लंघन होत असेल, अशा ठिकाणी कडक लॉकडाउन लावण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत, असे ते म्हणाले. राज्यातील जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यावर आमचा भर असल्याचंही त्यांनी म्हटलं.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात येत असली, तरीही राज्याबहेरून सर्व नागरिकांना येण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. मात्र, ज्या लोकांचे दोन्ही डोस झाले असतील, त्यांना आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक नसावे, यावर मंत्रिमंडळात विचारविनिमय सुरू आहे. लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.