थोडक्यात
सण उत्सवासाठी राज्यात एक मंडळ एक पोलीस अंमलदार
एका पोलिसांना संपूर्ण मंडळाची जबाबदारी
प्रशासन, मंडळाशी समन्वय साधून उत्सव पार पाडण्याची जबाबदारी
(Maharashtra Police) राज्यातील सण-उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी पोलिसांकडून नवीन योजना राबवली जात आहे. ‘एक मंडळ एक पोलीस अंमलदार’ या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक मंडळासाठी स्वतंत्र पोलीस नियुक्त केले जातील. त्या पोलिसाची जबाबदारी उत्सव काळात मंडळाशी सतत संपर्क ठेवणे आणि कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखणे अशी असेल. अशाप्रकारे महाराष्ट्रात राबवला जाणारा पहिलाच उपक्रम मानला जात आहे.
योजनेनुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मंडळांची यादी तयार केली जाईल. उपलब्ध अधिकाऱ्यांच्या संख्येनुसार प्रत्येकाला एक किंवा दोन मंडळांची जबाबदारी देण्यात येईल. नियुक्त अधिकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन समन्वय साधतील आणि उत्सव काळातील अडचणी सोडवतील.
गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी, मोहरम, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसारखे अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत असतात. या काळात पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण येतो. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, परवानग्यांशी निगडित अडचणी आणि तंटे टाळणे ही कामे आव्हानात्मक ठरतात. या पार्श्वभूमीवर ही योजना राबवली जात असून नागरिकांची सुरक्षितता आणि शांतता राखणे हे त्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.
तसेच, नियुक्त पोलिस, मंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस ठाणे यांच्यासाठी व्हॉट्सअॅप गट तयार केला जाणार आहे. यामुळे माहिती जलद गतीने पोहोचेल आणि गैरसमज, वाद किंवा तणाव टाळला जाईल. पोलिस महासंचालकांनी विश्वास व्यक्त केला आहे की या उपक्रमामुळे पोलीस आणि मंडळ यांचा समन्वय अधिक मजबूत होईल व सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडतील.