लाखोंच्या संख्येने श्रद्धाळू पंढरपूरकडे वारीसाठी निघाले आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आता पंढरीच्या वाटेवर असून राज्यातून विविध भागांमधून संतांच्या पालखी वारकऱ्यांसह निघालेल्या आहेत, याच पार्श्वभूमीवर आता वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि सात्विकतेचा सन्मान राखत या वर्षी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आचार्य तुषार भोसले यांनी जाहीर केले की, वारी ज्या-ज्या गावांतून जाईल त्या दिवशी त्या गावांमध्ये दारू आणि मांस विक्रीस बंदी घालण्यात येणार आहे.
यासोबतच, वारी कालावधीत पंढरपूर शहराच्या पाच किलोमीटर परिसरात मांस विक्रीवर पूर्णतः बंदी असणार आहे. हा निर्णय शासन स्तरावर घेतण्यात आला असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला मान्यता दिली आहे. आचार्य तुषार भोसले यांनी त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत.
या निर्णयामुळे वारीचे पावित्र्य, सात्विकता आणि आध्यात्मिक वातावरण अधिक दृढ होईल, अशी भावना व्यक्त होत आहे. वारकरी संप्रदायासह समाजातील विविध स्तरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. पंढरपूर आणि वारी मार्गावरील स्थानिक नागरिकांनी देखील या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.