पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा मार्ग मोकळा झाला असून, जागावाटपाचा तिढा सुटला आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असून, एकूण ७८ जागांवर संयुक्त रणनीती आखली आहे.
महायुतीतील जागावाटप फॉर्म्युल्याप्रमाणे भाजपला सर्वाधिक ७१ जागा मिळाल्या आहेत, तर शिवसेना (शिंदे गट) ला ४, अजित पवार गटाला २ आणि आरपीआय (आठवले गट) ला १ जागा लढवण्याची संधी मिळाली आहे. या निर्णयामुळे पनवेल पालिकेत महायुतीची ताकद वाढली असून, काही वेळातच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होईल. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट आणि आरपीआय एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याने विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
या युतीमुळे पनवेल महापालिकेच्या राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. जागावाटप ठरल्याने उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महायुतीची अंतिम तयारी पूर्ण झाली असून, आता निवडणुकीत विजयाची शक्यता वाढली आहे. या फॉर्म्युल्याचा पनवेलवासीयांना कसा फायदा होईल आणि विकासाच्या मुद्द्यांवर युती कितपत यशस्वी होईल, याकडे सध्य सर्वांचे लक्ष लागले आहे.