तब्बल दोन वर्षांच्या विलंबानंतर घेतलेल्या पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षेचा (पेट) निकाल मुंबई विद्यापीठाने जाहीर केला. या परीक्षेत एकूण २,००८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
विद्यापीठाने सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) या ऑनलाइन पद्धतीने १७ नोव्हेंबर आणि २४ नोव्हेंबरला ही परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी एकूण ५,०४० एवढ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. त्यातील एकूण ३,७९४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. यापैकी २००८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यापीठाचा हा निकाल ५३ टक्के एवढा लागला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेल लॉगिनमध्ये या परीक्षेचे प्रमाणपत्र लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांना मिळणारे प्रमाणपत्र विशेष फीचर क्यूआर कोडयुक्त असून, ऑनलाइन पडताळणीसाठी उपयुक्त ठरेल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.
दरम्यान, यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी सर्वाधिक ९२१ विद्यार्थ्यांनी पेट परीक्षा उत्तीर्ण केली. त्याखालोखाल वाणिज्य आणि व्यवस्थापन ४४६, मानव्यविद्या २७५ आणि आंतर विद्याशाचे ३६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.