(Crop Insurance Scheme) पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत रखडलेली भरपाईची रक्कम आज (सोमवार, 11 ऑगस्ट) थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यात खरीप हंगामासाठी 809 कोटी रुपये आणि रब्बी हंगामासाठी 112 कोटी रुपये असा एकूण 921 कोटींचा समावेश आहे. ही रक्कम ‘डीबीटी’ पद्धतीने पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर वितरित होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ होईल.
याआधी विमा कंपन्यांकडून थेट भरपाई जमा केली जात होती, मात्र यावेळी पहिल्यांदाच केंद्रस्तरावरून एकत्रित वाटप होणार आहे. नुकसानभरपाईचे निकष कठोर केल्याने शेतकऱ्यांना यावेळी चांगली रक्कम मिळत आहे. राज्य सरकारचा 1,028 कोटी रुपयांचा विमा हप्ता रखडल्याने भरपाई विलंबित झाली होती, परंतु 13 जुलै रोजी तो कंपन्यांकडे जमा झाल्यानंतर प्रक्रियेला वेग आला.
या हंगामात 95.65 लाख शेतकऱ्यांनी दावा दाखल केला होता. त्यापैकी 80.40 लाख शेतकऱ्यांना आधीच 3,588 कोटी रुपये मिळाले आहेत, तर उर्वरित 15.25 लाख शेतकऱ्यांना ही 921 कोटींची रक्कम देण्यात येणार आहे.
मुख्य वितरण कार्यक्रम राजस्थानच्या झुंझुनू येथे होईल. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, पिकांच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे.