थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
नवी दिल्ली : वंदे मातरम गीताच्या १५० वर्षपूर्तीच्या निमित्ताने लोकसभेत झालेल्या विशेष चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तीव्र निशाणा साधत ऐतिहासिक संदर्भांसह महत्त्वपूर्ण विधानं केली. वंदे मातरमने स्वातंत्र्यलढ्यात निर्णायक भूमिका बजावल्याचा उल्लेख करत, या गीताशी संबंधित १९३७ मधील काँग्रेसच्या निर्णयालाच मोदींनी “फाळणीची बीजे” असे संबोधले.
मोदी म्हणाले की १९३७ मध्ये मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने वंदे मातरमविरोधात आंदोलन केले. त्या काळी काँग्रेसने या विरोधाचा प्रतिकार करण्याऐवजी गाण्यातील काही कडवी बदलण्यास सहमती दर्शवली. “ही तडजोड देशासाठी घातक ठरली आणि पुढे फाळणीपर्यंत परिणाम नेणारी ठरली,” असे मोदींनी म्हटले. पंडित नेहरू यांनी सुभाषचंद्र बोसांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत, “गाण्याच्या काही ओळी मुस्लिम समाजाला दुखावू शकतात, अशी टिप्पणी नेहरूंनी केली होती,” असा आरोपही त्यांनी केला.
वंदे मातरमचे लेखक बँकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा गौरव करत मोदी म्हणाले की, “बँकिम बाबूंनी हे गीत त्या काळात लिहिले जेव्हा भारताबद्दल कमीपणाने बोलणे ही एक फॅशन बनली होती.” एका बंगालच्या खासदाराने ‘बँकिम दा’ऐवजी ‘बँकिम बाबू’ असा उल्लेख करावा, अशी विनंती केल्यानंतर पंतप्रधानांनी तत्काळ दुरुस्ती केली.
बंगालच्या ऐतिहासिक भूमिकेचा उल्लेख करत मोदींनी १९०५ च्या बंगाल विभाजनाची आठवण करून दिली. “ब्रिटिशांनी बंगालचे विभाजन करून फूट पाडण्याचा प्रयत्न केला, पण वंदे मातरम हे गीत आंदोलनाचा आत्मा बनले. हे गीत एकात्मतेचे प्रतीक ठरले,” असे ते म्हणाले. भाषणादरम्यान त्यांनी बंगाली आणि तमिळ भाषेतही काही ओळी उच्चारल्या.
वंदे मातरमने स्वातंत्र्यलढ्याला नवा उभार देत देशाची एकता मजबूत केली. गीताचा इतिहास पुढील पिढ्यांना सांगणे ही आपली जबाबदारी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. लोकसभेतील चर्चेला सत्तापक्ष आणि विरोधकांकडून मिळून मिश्र प्रतिसाद मिळाला.
पीएम मोदींनी वंदे मातरमच्या १५० वर्षानिमित्त काँग्रेसवर तीक्ष्ण टीका केली.
१९३७ मधील काँग्रेस निर्णयाला “फाळणीची बीजे” असे संबोधले.
बँकिम चंद्र चट्टोपाध्याय यांचा गौरव करत गीताचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले.
बंगाल विभाजन १९०५ आणि स्वातंत्र्यलढ्यातील गीताची भूमिका अधोरेखित केली.
भाषणादरम्यान बंगाली आणि तमिळ ओळीही उच्चारल्या गेल्या.