महाराष्ट्र

Organ Donation |वर्धात मरणोत्तर अवयवदानाने चार व्यक्तींना जीवनदान

Published by : Lokshahi News

वर्धा जिल्ह्यात कोरोना काळातही सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात मरणोत्तर अवयवदानातून प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे कार्य सुरूच असून या वर्षातील दुसरी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बुधवारी करण्यात आली. नागपुरातील मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे भरती झालेल्या ५० वर्षीय रुग्णाने केलेल्या अवयवदानातून सावंगी रूग्णालयात भरती असलेल्या एका ४३ वर्षाच्या रुग्णावर मूत्रपिंड म्हणजेच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. शिवाय, या एका व्यक्तीच्या मरणोत्तर अवयवदानाने चार व्यक्तींना नवजीवन प्राप्त झाले आहे. बुटीबोरी नजीकच्या टाकळघाट येथील निवासी असलेले छायाचित्रकार दिनेश सखाराम सोनवणे यांना ब्रेन स्ट्रोकमुळे मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यांचा मेंदू पूर्णतः मृत झाल्याचे उपचार करणाऱ्या तज्ज्ञांच्या व शल्यचिकित्सकांच्या तपासणीत स्पष्ट झाल्यामुळे तशी कल्पना परिवारातील सदस्यांना देण्यात आली. कोणतेही वैद्यकीय उपचार यापुढे उपयुक्त ठरणार नाही याची जाणीव झाल्याने दिनेश यांची पत्नी सारिका, मुलगा सुयश, मुलगी मानसी आणि पुतण्या सुयोग यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. आप्तजनांच्या अनुमतीनंतर अवयव शरीरातून विलग करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या परवानगीने सदर अवयव विविध रुग्णालयांकडे प्रत्यारोपणाकरिता सुपूर्द करण्यात आले. त्यातून मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमधील ४४ वर्षीय रुग्णावर हृदय प्रत्यारोपण तर मेडिट्रिना हॉस्पिटलमधील ६७ वर्षीय रुग्णावर यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण करण्यात आले.

त्यासोबतच, अवयवदानातील एक किडनी नागपुरातीलच न्यू इरा हॉस्पिटलमध्ये ३३ वर्षीय रुग्णावर तर सावंगी मेघे रुग्णालयातील ४३ वर्षीय रुग्णावर दुसऱ्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले. दिनेश सोनवणे यांच्या मरणोत्तर अवयवदानाने चार व्यक्तींना नवे आयुष्य प्राप्त झाले आहे. यासोबतच, नागपुरातील माधव नेत्रपेढीकडे नेत्रप्रत्यारोपणासाठी दिनेश यांचे डोळे सोपविण्यात आले आहे. सावंगी मेघे रुग्णालयात डॉ. संजय कोलते, डॉ. अमित पसारी, डॉ. अमोल बावणे, डॉ. अभिजित ढाले, डॉ. जय धर्मशी, डॉ. प्रसाद गुजर, डॉ. निलेश गुरू, डॉ. संज्योत निनावे, डॉ. विवेक चकोले, डॉ. नीता वर्मा, डॉ. जुही जाधव, डॉ. रोशनी माणिक, डॉ. धनश्री वंजारी आणि सहयोगी वैद्यकीय चमूने सदर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्णत्वाला नेली. या संपूर्ण प्रक्रियेत रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, समन्वयक डॉ. रुपाली नाईक यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर