थोडक्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा
(Navi Mumbai Airport Inauguration ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर विमानतळ परिसर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविला जाणार आहे.नवी मुंबई विमानतळ देशातील सर्वात आधुनिक आणि पर्यावरणपूरक विमानतळांपैकी एक मानले जाते.
टर्मिनल्स आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत आणि प्रवाशांना मेट्रो स्टेशनवर थेट चेक-इन, एक-अप आणि दोन-मार्गी सामान सुविधा यासारख्या सुविधांचा आनंद घेता येईल.जल वाहतुकीद्वारे जोडले जाणारे हे देशातील पहिले विमानतळ ठरणार असून राष्ट्रीय महामार्ग , मुख्य शहरी रस्ते, उपनगरीय रेल्वे, मेट्रो व जल वाहतुकीद्वारे हे विमानतळ जोडले जाणार आहे.
उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर ते प्रथम टर्मिनलची पाहणी करतील. या विमानतळामुळे आता मुंबईच्या वाढत्या हवाई वाहतुकीवरील ताण कमी होण्याची अपेक्षा असून हवाई वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल. विमानतळावरून प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले. नवी मुंबईत पंतप्रधानांचे आगमन होईल आणि नव्याने बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची आज दुपारी 3 च्या सुमाराला ते पाहणी करतील त्यानंतर दुपारी 3:30 च्या सुमारास पंतप्रधान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील.
उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान राजभवनात मुक्काम करणार असल्याची माहिती मिळत असून रात्रीच्या बैठकीत राजभवनात मुंबईत सुरू असलेल्या सर्व मोठ्या विकास कामाच्या प्रकल्पांची परिस्थिती जाणून घेणार आहेत. तसेच बुलेट ट्रेन, कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प या प्रकल्पासहित इतर महत्त्वाच्या प्रकल्पाची माहिती जाणून घेणार आहेत. यासाठी संबंधित प्रकल्पाचे सर्व महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी माहिती देण्यासाठी राजभवन येथे उपस्थित राहणार आहेत.