आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मार्केट यार्ड पोलीस ठाणे हद्दीतील गंगाधाम चौकामध्ये एक दुर्दैवी अपघात घडला. MH-14 AS-8852 या क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने 29 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला असून एक पुरुष गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे, सिग्नल सुटल्यावर ट्रक चालक शौकत कलकुंडी याने निष्काळजीपणे वाहन चालवत सोनी दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेमध्ये दीपाली सोनी (वय 29) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती जगदीश सोनी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मार्केट यार्ड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. अपघातात वापरलेला ट्रक देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गंगाधाम व मार्केट यार्ड परिसर वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गजबजलेला असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक गाड्यांची हालचाल होत असते. परिणामी या परिसरातील रहिवाशांना विशेषतः लहान मुलांना अवजड वाहनांच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि नियंत्रणासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.