पुणे महापालिका निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असतानाच शहराच्या राजकारणात एक खळबळजनक घडामोड समोर आली आहे. पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने थेट निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली असून, त्याच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या ‘सिनेस्टाईल’ एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू असताना, आंदेकर कुटुंबाने एकाच वेळी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
पोलिस व्हॅनमधून थेट अर्ज भरण्याची एन्ट्री
बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी आज महापालिका निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अर्ज भरण्याचा हा क्षण सर्वसामान्य नव्हता. पोलिस बंदोबस्तात, थेट पोलिस व्हॅनमधून बंडू आंदेकरला बाहेर काढण्यात आलं. हातात बेड्या, तोंडावर काळा स्कार्फ, भोवती पोलीस आणि समर्थकांचा गराडा हा सारा प्रकार पाहता, अर्ज भरण्याचा हा प्रसंग एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा भासत होता. या घटनेने एकच प्रश्न उपस्थित केला पुण्याच्या राजकारणात आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती उघडपणे लोकशाहीच्या व्यासपीठावर येत आहे का?
घोषणाबाजीने परिसर दणाणला
अर्ज दाखल करताना बंडू आंदेकरने जोरदार घोषणाबाजी करत स्वतःची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला.
“मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही,”
“नेकी का काम, आंदेकर का नाम,”
“आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत,”
“बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय,”
अशा घोषणा देत बंडू आंदेकरने स्वतःला ‘लोकशाहीतील उमेदवार’ म्हणून सादर केलं.
इतकंच नव्हे तर “वनराज आंदेकर जिंदाबाद” अशा घोषणाही यावेळी दिल्या गेल्या. समर्थकांच्या उपस्थितीमुळे अर्ज भरण्याच्या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
आंदेकर कुटुंबाचा राजकीय प्रवास
आंदेकर कुटुंबाचं पुण्याच्या राजकारणातलं स्थान काही नवीन नाही. बंडू आंदेकर यांचा मुलगा वनराज आंदेकर हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना नगरसेवक होता. त्या काळात आंदेकर कुटुंबाचं स्थानिक राजकारणात वजन वाढलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा बंडू आंदेकर स्वतः मैदानात उतरल्याने, हा केवळ उमेदवारी अर्ज नसून एक प्रकारचं शक्तिप्रदर्शन असल्याचं बोललं जात आहे. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांच्या अर्जामुळे आंदेकर कुटुंबाने सामूहिकपणे राजकीय उपस्थिती दाखवून दिली आहे.
राष्ट्रवादीकडून उमेदवारीची शक्यता?
या साऱ्या घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरत आहे तो म्हणजे बंडू आंदेकर नेमक्या कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार? राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी यापूर्वी लक्ष्मी आंदेकर आणि बंडू आंदेकर यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे या व्हिडिओनंतर आता बंडू आंदेकरालाही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव ठळकपणे घेतलं जात आहे.
राजकीय व सामाजिक प्रश्न उपस्थित
बंडू आंदेकरच्या उमेदवारी अर्जामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा राजकारणातील वाढता सहभाग, कायदा-सुव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि लोकशाही मूल्यांची कसोटी या सगळ्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. एका बाजूला ‘विकास’ आणि ‘लोकशाही’ची भाषा, तर दुसऱ्या बाजूला पोलिस बंदोबस्त, बेड्या आणि काळा स्कार्फ या विरोधाभासामुळे पुण्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.
पुढे काय?
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंदेकर कुटुंबाचा हा राजकीय प्रवेश नेमका कोणता वळण घेणार, राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत उमेदवारी जाहीर करणार का, आणि मतदार या सगळ्याकडे कशा नजरेने पाहतात, हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र, एवढं मात्र नक्की की, बंडू आंदेकरच्या अर्जाने पुण्याच्या निवडणूक रणधुमाळीत एक वेगळीच चर्चा पेटवली आहे.