थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नाशिकमधील संयुक्त सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर पक्षांतर, पैशाच्या लुटी आणि निवडणुका रखडवल्यावरून जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत राज ठाकरे म्हणाले, "चार वर्षांपूर्वी मुदत संपली तरी निवडणुका का झाल्या नाहीत? सरकारनं उत्तर द्यावं. महाराष्ट्रात गोंधळ सुरू आहे, कोण कुठं चाललंय माहीत नाही. इतका चुकीचा कॅरम फुटलाय, कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहेत हे कळत नाही."
राज ठाकरे पुढे म्हणाले, "निवडणुका रखडल्या कारणं कुणालाही सांगता येत नाही. छाननीत एबी फॉर्म गिळणारे वेडेपिसे झाले आहेत. वेळ नव्हती, दिवस नव्हता, अन्यथा सकाळी फॉर्म बाहेर पडला असता. बिनविरोध निवडणुका होतात, मतदानाचा अधिकारही देत नाहीत का? दहशतीतून किंवा पैशाने उमेदवार खरेदी करतात. कल्याण-डोंबिवलीत एका घरातून तिघे उभे आहेत, त्यांना १५ कोटींची ऑफर? कुणाला पाच कोटी, दोन कोटी? हे पैसे कुठून येतात?"
भाजपच्या पक्षांतरावर सडकून टीका करत ते म्हणाले, "भीती घालायची, दहशत करायची आणि निवडणुका घ्यायच्या. नाशिकमध्ये भाजपला माणसं नव्हती का? ५२ साली जन्मलेल्या जनसंघाला २०२६ ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात? तुमची माणसं उभी केली होती ना, दुसऱ्यांची कडेवर घेऊन का नाचता?"
उद्धव ठाकरे यांच्या सहभागामुळे ही सभा महत्त्वाची ठरली असून, ठाकरेंची ही जोड निवडणुकीत गेमचेंजर ठरेल, असा अंदाज आहे. महापालिका निवडणुकांमध्ये पैशाची लूट आणि पक्षांतराच्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलं आहे.
नाशिकच्या सभेत राज ठाकरे यांचा भाजपवर आक्रमक हल्ला
महापालिका निवडणुका रखडल्यावरून सरकारवर सवाल
पैशाची लूट व पक्षांतराच्या आरोपांमुळे वातावरण तापलं
उद्धव ठाकरे उपस्थितीत ठाकरेंची जोड चर्चेत